डॉ. शैलेंद्र भोळे यांच्या स्वप्नपूर्तीची गरुडझेप !

0

काही व्यक्तिमत्त्व आपल्या सेवेतून, कार्यकर्तृत्वातून पुढे येत असतात. देहभान विसरून ते त्यात झोकून देत असतात. मग त्यात वैद्यकीय सेवा असेल तर त्याला तोडच नाही. सुमारे चाळीस वर्षे इमानेइतबारे आपलेपणाने आरोग्यसेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र भोळेपुढे नतमस्तकच व्हायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या आणि मल्टिस्टोरेज इस्पितळाचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेणारा आपला सर्वांचा लाडका मित्र डॉ. शैलेंद्र म. भोळे याचा आज वाढदिवस! इस्पितळात डॉ.शैलेंद्र आणि डाॅ. सौ. भोळे या दाम्पत्याला दोन वर्षांपूर्वी भेटण्याचा दुर्मिळ योग आला होता.

ओपीडीसाठी रुग्णांची लगबग असतानाही आणि आपल्या व्यस्त दिनक्रमातून या दाम्पत्याने सुमारे अर्ध्या तासाचा वेळ दिला. आग्रहाने घरी चहापानासाठी चल म्हणाला. सुरुवातीला त्याने आपल्या मल्टिस्टोरेज इस्पितळाचं बहुमजली सुरू असलेलं बांधकामही दाखवलं! सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं हे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव इस्पितळ ठरेल आणि नक्कीच नावलौकिक मिळवील, असा विश्वासही वाटला. या इस्पितळात दर्शनी भागात मेडिकल, पॅथाॅलॉजी आणि जवळपास सर्व आजारांवर सुविधा देण्याचा डॉ. शैलेंद्रचा मानस आहे. शेवटच्या मजल्यावर आयसीसीयू युनिट इत्यादी सुविधा सुरू झाल्याही असतील. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून डॉ. शैलेंद्रचा प्रवास थक्क करणारा आहे. एक छोटेखानी रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करणं कठीण असतं. त्याने आपली आरोग्यसेवा अहोरात्र सुरू ठेवली.

‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद डॉ. शैलेंद्रने सार्थ ठरवलं. रुग्णांना त्याच्या ॲप्रनची कधीही भीती वाटली नाही. किंबहुना आपल्या पवित्र हातगुणरूपी सेवेने त्याने अनेक महिलांची प्रसूती सुलभ होण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचा नातलगांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच डॉ. शैलेंद्रची श्रीमंती!. इस्पितळ हाच श्री आणि सौ. डॉ. भोळे दाम्पत्याचा श्वास आहे. डॉ. शैलेंद्रचे पाय नेहमीच जमिनीवर असल्याचा अभिमानही वाटतो! कधीही फोन करा. व्यस्त दिनक्रमातून तो फोन उचलतो. त्याचा हा साधेपणा अनेकांना गारुड घालतो. आता एकाच इस्पितळात अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी डॉ. शैलेंद्रची तळमळ आहे. बाळाची धडकन ऐकण्यासाठी तुझा स्टेथास्कोप असाच आसुसलेला राहो. डॉ. शैलेंद्र तुझी वैद्यकीय क्षेत्रातली ‘स्वप्नपूर्तीची गरुडझेप’ अशीच यशस्वी ठरली. आता तिची वेल अवकाशाला स्पर्श करो. तुला उदंड आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
-सत्यवान ताठरे, मुंबई .tatharesatyawan@gmail.com/ 9869939227

Leave A Reply

Your email address will not be published.