धुळे, जळगाव जिल्ह्यात वीज पडून पशुधनाचा मृत्यू ;निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्याचे नुकसान
धुळे/जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. या दरम्यान वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या असून धुळ्यातील शिरपूरच्या अभानपूर येथे वीज पडून दोन बैल तर जळगाव जिल्ह्यातील शिरसोदे येथे वीज पडून पंधरा मेंढ्यांचा मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अभानपूर येथे रविवारीच्या रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. दरम्यान अभानपूरपासून एक किमी अंतरावरील रतु पोलाद भिल या शेतकऱ्याच्या बैलांच्या गोठ्यावर वीज पडल्याने त्यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरामध्ये विज पडल्यामुळे पंधरा मेंढ्या व एक बकरी दगावली असून मेंढपाळला सुद्धा विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले. मेंढ्यांच्या सांभाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या दामू भिल या मेंढपाळावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. यावेळी पशुधन अधिकारी डॉ. योगेश देशमुख यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.