न्यायालयातून पळ काढलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

जळगाव । पोलिसांच्या हाती तुरी देत न्यायालयातून पळ काढलेला अट्टल गुन्हेगार भोलासिंग बावरी याला गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री तीनच्या सुमारास घराकडे जात असताना, एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली. दंगल, हाणामारी, लुटमार, घरफोड्या यांसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापुरा, जळगाव) नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता.

नंतर त्याने भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. न्यायालयातून कारागृहात घेऊन जाण्यापूर्वीच भोलासिंग बावरी याने पळ काढला होता. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पथक त्याचा शोध घेत होते. मात्र, रात्रभर तो मिळून आला नाही.

गुरुवारी (ता. १३) रात्री तीनच्या सुमारास लपतछपत सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराच्या दिशेने घरी जाताना एमआयडीसीच्या गस्ती पथकाच्या नजरेत तो आला. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, नरेंद्र मोरे, विनोद आस्कर यांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. नंतर त्याला शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.