मुंबई- राज्यात विधानसभेच्या निवडणूक लवकरच लागू शकतात अशातच विधानसभेतील जागांबाबत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं असून भाजपने आम्हाला ८० ते ९० जागा द्याव्यात. लोकसभेसारखं विधानसभेमध्ये खटपट चालणार नाही असं ते म्हणाले होते. छगन भुजबळांच्या काही वक्तव्यांमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी छगन भुजबळांबाबत मनातील खदखद व्यक्त केली आहे.
निलेश राणे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणालेत की, ‘श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.’
आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही. कारण भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असं देखील राणे म्हणाले आहेत.