मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी ही जागा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर यामुळे अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ हे नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नाराजी दूर करण्याकरिता भाजपा नेते गिरीश महाजन यांनी भुजबळांची भेट घेतली. पण त्यांच्या या भेटीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे.
भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळ फार्म जाऊन महाजनांनी त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे समजले, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आणि महाजनांनी थेट भुजबळांचे फार्महाऊस गाठले.
याबाबत बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गिरीश महाजनांचे हे कामच आहे. त्यांच्याकडे दूध, दही आणि लोणी खूप आहे. ज्यांना जिथे गरज पडली ते तिथे लोण्याची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन दरवाजात पोहोचतात. जेवढी लोणी लावता येतील तेवढी लावायची आणि त्यांची नाराजी दूर करायची इतकेच काम त्यांच्याकडे आहे. लोण्याने भरलेले मडके त्यांच्याकडे आहे, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
याबाबत बोलताना महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे म्हणाले की, छगन भुजबळ हे नाराज नसून ते प्रचारात सक्रिय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर, साधू म्हणून शांतिगिरी महाराजांचा सन्मान आहे. समविचारी मत विभाजन टाळण्यासाठी शांतीगिरी महाराज काही तरी निर्णय घेऊ शकत होते, मात्र त्यांनी ऐकले नाही तर नाशिकची जनता सुज्ञ आहे. ते मतविभाजन करणार नाही, असेही त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.