नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील पहिलवान युवकाची गोळ्या घालून हत्या..
इगतपुरी: प्रतिनिधी भागीरथ आतकरी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे या युवकाची अज्ञात मारेकऱ्यांनी भर दुपारी महामार्गावर कोयत्याने वार करून व गोळ्या घालून हत्या केली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.
भूषण हा रोजच्या प्रमाणे जनावरांसाठी खाद्य घेवून नाशिक कडून वाडिवऱ्हे कडे येत असताना महामार्गावरील राजूर बहुला शिवारातील सरबजीत धाब्या जवळ महामार्गावर पाठीमागून पाठलाग करीत येत असलेल्या मारेकऱ्यांनी भूषण यास थांबवत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.अचानक झालेल्या हल्ल्याने भूषण याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यास गोळ्या घालून ठार केले व तेथून त्यांनी पलायन केले. सदर हत्या ही पूर्व वैमनस्यतून झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
महामार्गावर आणि भर दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटने नंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ धाव घेतली. तर सदर हत्येचे मुळ कारण तपासून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी घटनास्थळाला भेट देत परिसरातील सीसीटिव्ही तपासण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून,पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोऊनि सुनील बिऱ्हाडे पोलिस नाईक प्रवीण काकड, धोंडगे, कचरे आदीचे पथक तपासकामी परिश्रम घेत आहेत, होते.घटने नंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. दरम्यान रात्री उशीरा पर्यत पोलीस घटनेचा तपास करत आहे.
*************
भूषण लहामगे पार्श्वभूमी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील रहिवासी असलेला भूषण दिनकर लहामगे ( वय ४२ ) हा दोन भाऊ,आई वडील, पत्नी व चार मुलींसह राहत होता.लहानपणापासून कुस्तीचे वेड असल्याने त्याने महराष्ट्रातील अनेक कुस्ती स्पर्धा मध्ये सहभाग घेत बक्षिसे जिंकली आहेत.६५ किलो वजनी गटात त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले आहे. दहा ते बारा वर्षांपासून त्याने कुस्ती सोडून शेती आणि दुग्ध व्यवसाय करत होता अचानक झालेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.