६ दिवसांपासून बेपत्ता डॉक्टरचा अखेर मृतदेह सापडला; जमीन व्यवहारातून खून झाल्याचा उलगडा
पाचोरा : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून कन्नड येथील व्यावसायिक डॉक्टरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे उघडकीस आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतदेह अखेर सोमवारी (दि. २३) सकाळी बहुळा धरणात सापडला. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी तपास करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

डॉ. संजय तेली हे वैद्यकीय व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील यांची दोन एकर जमीन १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरला होता. या व्यवहारापोटी डॉ. तेली यांनी राहुल पाटील याला ८० लाख रुपयांचा बयाणा दिला होता.


दि. १७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली हे कन्नड येथून चारचाकी वाहनाने मुलीसोबत निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे आपल्या शालकाकडून ५ लाख रुपये घेण्यासाठी गेले. त्यानंतर सांगवी (प्र. लोद) येथील घरी जाऊन त्यातील ३ लाख १० हजार रुपये ठेवले आणि उर्वरित १ लाख ९० हजार रुपये घेऊन दुसऱ्या दिवशी गोराडखेडा येथे राहुल पाटील याच्याकडे गेले.
यावेळी जमीन व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. राहुल पाटील याने लोखंडी रॉडने डॉ. तेली यांच्या डोक्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
यानंतर राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकून दिल्याची कबुली दिल्याचे समजते. दरम्यान, डॉ. तेली हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शोधासाठी १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत राहुल धर्मराज पाटील आणि त्याच्या सालदाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. २२) सायंकाळी सात वाजेपासून बहुळा धरणात मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
दरम्यान, सोमवारी (दि. २३) सकाळी सुमारे ७ वाजता बहुळा धरणात डॉ. संजय तेली यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने आरसीपी प्लाटूनसह पाचोरा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणी पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि अन्य बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.