देशाला चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ९ राज्यांना इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

0

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचे आज चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, १७ नोव्हेंबरपर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील ही हवामान प्रणाली पुढे सरकत असताना तिचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आग्नेय बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६५ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचे झोत ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांसह किनारी भागातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात चक्रीवादळाचा परिणाम नाही
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. राज्यात सध्या कोरडे हवामान कायम राहणार असून पावसाचा कोणताही अलर्ट नाही. मात्र, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार आहे.

राज्यात सध्या दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री तसेच पहाटे गारठा असे विरोधाभासी हवामान जाणवत आहे. किमान तापमानात आणखी घट झाल्यास सकाळच्या वेळी गारवा वाढणार असून रात्री थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार
उत्तर महाराष्ट्रात रात्रीचे तापमान १५ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान १२ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कोकणात कमाल तापमान ३३ आणि किमान १९ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात कमाल तापमान ३४, तर किमान तापमान २० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे आणि निरभ्र राहणार आहे.

एकीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असताना, महाराष्ट्रात मात्र पावसाचा धोका नसून पुढील दोन-तीन दिवस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.