शेतातून चोरीला गेलेली मोटार विक्रीपूर्वीच पोलिसांच्या हाती; रावेरमध्ये चौघांना अटक

0

रावेर | 

रावेर तालुक्यातील रामजीपूर परिसरात शेतातून चोरीला गेलेल्या विद्युत मोटारीचा पोलिसांनी काही दिवसांतच छडा लावला आहे. चोरीची ५ एचपीची मोटार विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटारही हस्तगत करण्यात आली आहे.

रामजीपूर येथील शेतकरी मोहन लालचंद कवाडकर यांच्या गट क्रमांक १६२२/२ मधील शेतातून ३ ऑक्टोबरच्या रात्री ५ एचपी क्षमतेची ‘समुराई’ कंपनीची विद्युत मोटार चोरीला गेली होती. याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतातील मोटारी व तांब्याच्या वायर चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रावेर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला.

दरम्यान, चोरीची मोटार रामजीपूर परिसरात विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र सुधाकर महाजन (३०), उमेश प्रकाश धनगर (२३), रितेश जगन्नाथ कवाडकर (२३) आणि आनंदा गोपाळ धनगर (२८) या चौघांना ताब्यात घेतले. हे सर्व रामजीपूर येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी चौकशी केली असता चोरीच्या मोटारीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आरोपींनी लपवून ठेवलेली मोटार पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

या टोळीचा यापूर्वीच्या शेतमोटार चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का आणि चोरीच्या मोटारी खरेदी करणारे व्यक्ती कोण आहेत, याचा तपास रावेर पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गवित, फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, जुन्या मोटारी, तांब्याची वायर किंवा विद्युत पंप संशयास्पद पद्धतीने विक्री अथवा खरेदी करणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.