पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

0

लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्ष राहून काम करावे

लातूर | लातूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा आज जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा, पाणीपुरवठा योजनांची स्थिती, खरीप पिकांचे संभाव्य नुकसान तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. एखाद्या गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था आधीच सज्ज ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

तलावातील मृत जलसाठा वापरण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करावी. ऐनवेळी नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने आवश्यक सज्जता ठेवावी. सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याने अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त पथके गठीत करून कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.

महानगरपालिका, महावितरण, पोलीस, महसूल तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने संयुक्त मोहीम राबवावी.
मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी लातूर, बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांचे संयुक्त पथक गठीत करून कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

पाणीपुरवठा योजनांमधील गळती रोखण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी, असेही निर्देश देण्यात आले.

पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन
पाणीटंचाईच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध राहणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करावे. पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात यावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

खरीप पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करण्याच्या सूचना

लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून नुकसानीची काळजीपूर्वक आणि वस्तुनिष्ठ नोंद करावी. प्रत्यक्ष नुकसानीची स्थिती अहवालातून स्पष्टपणे मांडली जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, विविध सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा आणि खरीप पिकांची सद्यस्थिती याबाबत माहिती दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांकडूनही तालुकानिहाय पाणी व पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

उदगीर आणि जळकोट तालुक्यात डिसेंबरपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतरची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उषाताई पाटील, आमदार श्री विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार श्री संजय बनसोडे, महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.