जळगाव एलसीबीची धडक कारवाई! बसस्थानकांवर चोऱ्या करणारा सराईत चोरटा जेरबंद

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका आंतरजिल्हा चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सागर दादासाहेब जाधव असे या अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खर्डे येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

मागील काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र, सोन्याची पोत आणि चैन चोरीस जाण्याचे सत्र सुरू होते. या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना चोरट्यांचा तात्काळ शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. या आदेशानुसार एलसीबीचे पथक बसस्थानक परिसरात साध्या वेशात गस्त घालत होते.

१२ सप्टेंबर रोजी एलसीबीचे पथक जळगाव मुख्य बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना, संशयित सागर जाधव हा अत्यंत संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बसस्थानकांवरील गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने लांबवल्याची कबुली दिली.

पंचांसमक्ष त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, त्यात सोन्याचे दागिने आढळून आले. कसून चौकशी केल्यावर त्याने धक्कादायक खुलासे केले. सुमारे महिनाभरापूर्वी मुक्ताईनगर बसस्थानकावर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोत, १५ दिवसांपूर्वी एरंडोल बसस्थानकावर सोन्याची चैन आणि १० ते १२ दिवसांपूर्वी जामनेर बसस्थानकावर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती चोरी केल्याचे त्याने कबूल केले.

एलसीबीने संबंधित पोलीस ठाण्यांशी तात्काळ संपर्क साधून माहितीची खात्री केली. आरोपीच्या वर्णनावरून मुक्ताईनगर, एरंडोल आणि जामनेर पोलीस ठाण्यांमधील एकूण तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांनी २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ते एरंडोल पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत. या धडक कारवाईमुळे बसस्थानकांवर चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.