मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

0

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. आज जालन्याच्या अंतरवली सराटीत झालेल्या बैठकीत मुंबईला मोर्चा काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईत मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्यासाठीचा रुटही सांगितला आहे. चार दिवस, चार रात्र जरांगेंचा मार्च सुरू राहणार आहे. पाचव्या दिवशी मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ धडकणार आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

मुंबईला कसं जाणार?
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला कसं जायचं याची इत्थंभूत माहिती दिली आहे. अंतरवलीतून मुंबईकडे कूच केल्यानंतर पहिला मुक्काम पाटोदा येथे करण्यात येणार आहे. दुसरा मुक्काम श्रीगोंदा येथे केला जाणार आहे. तर तिसरा मुक्काम पुण्यात हडपसरला केला जाणार आहे. चौथा मुक्काम खोपोलीला होणार असून त्यानंतर पाचव्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात धडक देण्यात येणार आहे. एकूण चार मुक्काम असणार आहे. पाचव्या दिवशी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावातील मराठा समाजातील बांधवांना मुंबईला येण्याचं आवाहन केलं आहे. ठरलेल्या मार्गानेच मुंबईला यायचं आहे. ज्यांना मुंबईला येणं शक्य नाही, त्यांनी ठरलेल्या मार्गावर येऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत. कुटुंबासह सर्वांनी या मार्गावर यायचं आहे. तुमच्या गावापासून कितीही लांबचं अंतर असलं तरी तुम्हाला या मार्गांवर येऊन आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. तुमचा आशीर्वाद हा केवळ आशीर्वाद राहणार नाही, तर ती तुमची ताकद दिसणार आहे, असं जरांगे यांनी सांगितलं.

वर्गणी काढा…
जे लोक येणार नाही, त्या गावातील लोकांनी सर्वांनी वर्गणी काढायची आहे. मुंबईला जाणाऱ्यांसाठी वाहने करून द्यायची आहेत. तसेच त्यांना शिदोरीही द्यायची आहे. एकावरच ताण पडू नये म्हणून सर्वांनी मिळून सामूहिकरित्या हे करायचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.