जळगाव जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार; गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील १४ जणांना एकाच दिवशी हद्दपार करण्यात आले आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक सहा जणांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ जामनेरमधील तीन, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, तर रामानंदनगर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगारावरही हद्दपारीचा आदेश बजावण्यात आला आहे.

नशिराबाद येथील अताउल्ला उर्फ मायाबाई अमानुल्ला शहा, मुक्तार शहा खलील शहा, अक्रम शहा सादिक शहा, रोहित दिलीप नाथ, विपुल गोविंदा नाथ आणि आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर यांचा कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर याच्यावर, तर एमआयडीसी हद्दीतील रामनगर येथील अरमान चिधा पटेल याच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सामरोद येथील प्रकाश सुभाष शिंदे व जगन्नाथ रामकृष्ण कोळी, फत्तेपूर येथील सोपान अशोक इंगळे आणि बेटावद येथील पांडुरंग पाटील यांच्यासह इतर संबंधितांनाही जिल्ह्याबाहेर करण्यात आले आहे.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी

संबंधित व्यक्तींविरोधात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे स्थानिक पातळीवर शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही पोलिसांनी निदर्शनास आणून दिले.

यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांकडून हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून ठरावीक कालावधीसाठी बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले.

कोणत्या पोलीस ठाण्याची किती कारवाई?
नशिराबाद – ६
जामनेर – ३
एमआयडीसी – २
रामानंदनगर – १
जिल्हापेठ – १
फत्तेपूर – १
एकूण – १४

हद्दपारीच्या काळात संबंधितांनी प्रशासनाची परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई केली जाईल. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.