महिनाभराच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अशातच हवामानात मोठा बदल झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगावकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

कमी दाबाचा पट्टा सक्रिय
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झाला आहे. हा पट्टा ओडिशाच्या भागातून वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आज २ ते ६ सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

हलक्या ते मध्यम सरी: जळगाव जिल्ह्यात आजपासून (२ सप्टेंबर) पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता असून, जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते हलक्या तर काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. या हवामान प्रणालीमुळे जळगाव शहर किंवा जिल्ह्यात कुठेही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या दडीमुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.