डांभुर्णीत भर चौकात सरपंचाचा हवेत गोळीबार; जळगावातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोळन्हावीचे सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) याला जळगावातून अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

२७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता डांभुर्णी येथील किनगाव रोडलगत गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांना गोळीबाराची रिकामी पुंगळी आढळून आली. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील भौतिक पुरावे संकलित केले.


गोळीबारानंतर आरोपी जळगावकडे गेल्याचे समोर आल्यानंतर यावल पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे १ वाजता कालिका माता मंदिर परिसरातून सोळंके याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत डांभुर्णीतील काही तरुणांसोबत झालेल्या वादातून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती आहे. गोळीबारासाठी वापरलेला देशी कट्टा कोळन्हावी शिवारातील हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याचे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी तो जप्त केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास यावल पोलिसांकडून सुरू आहे.