नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गिरीश महाजनांची नियुक्ती, छगन भुजबळ म्हणाले, ‘माझ्या शुभेच्छा’

0

नाशिक । महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपचे नेते आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानंतर पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी महाजनांचे अभिनंदन करत, “माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना,” अशी प्रतिक्रिया दिली.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सात आमदार असल्याने सर्वाधिक आमदारांच्या संख्येच्या जोरावर पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील अंतर्गत समीकरणांमुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय बराच काळ प्रलंबित राहिला. अखेर महायुतीतील तिढा सोडवून गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली.

भुजबळांचा महाजनांना टोला अन् शुभेच्छाही

गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर बोलताना छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. “माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पालकमंत्रिपद न मिळाल्याने मी काही छोटा होत नाही,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.भुजबळ म्हणाले की, कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याने पालकमंत्री व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे. आपण यापूर्वी अनेक वर्षे नाशिकसह मुंबईचेही पालकमंत्रिपद सांभाळले आहे. त्यामुळे या पदाची आपल्याला फारशी आस नव्हती, असे त्यांनी सांगितले.

‘पालकमंत्री हे जिल्ह्याचे ठाणेदार’

पालकमंत्रिपदाला मान-सन्मान आणि जिल्ह्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. मात्र, पदावर नसतानाही मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांकडे एखादा प्रश्न मांडल्यास त्यावर काम होऊ शकते, असे भुजबळ यांनी सांगितले.नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील कोणत्याही नेत्याकडे हे पद असले तरी आपण त्यांना सहकार्य करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

रस्ते आणि खड्ड्यांचे मोठे आव्हान

दरम्यान, नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नव्या पालकमंत्र्यांसमोर मोठे आव्हान असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. महानगरपालिका, कुंभमेळा प्राधिकरण, कुंभमेळामंत्री आणि पालकमंत्री यांनी एकत्रितपणे काम करून नाशिकमधील रस्ते, वाहतूक आणि नागरिकांच्या इतर समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिकमधील नागरिकांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, नव्या पालकमंत्र्यांनी या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर सोडवावेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.