साखरझोपेत असताना काळाचा घाला, मुंबईमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

0

मुंबई । मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागातील चिरागनगर परिसरात मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. गौशिया चाळीतील ३ ते ४ घरांवर दरड कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, मृत सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री सुमारे ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान नागरिक साखरझोपेत असताना अचानक दरड कोसळली. काही क्षणांतच ३ ते ४ घरांवर मोठ्या प्रमाणात मातीचा आणि दगडांचा ढिगारा कोसळल्याने घरातील नागरिक त्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू असून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मात्र अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथके अत्यंत काळजीपूर्वक ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. दरड कोसळल्यामुळे परिसरातील ३ ते ४ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

पालिकेने नोटीस देऊनही नागरिकांचे स्थलांतर झाले नाही

या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या सूचनांचा मुद्दाही समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेने याबाबत नोटीसही दिली होती; मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.