बोगस डॉक्टरांविरोधात जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई

0

जळगाव । कोणतीही वैध वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत नोंदणी नसतानाही रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. चोपडा तालुक्यातील वटार येथे अ‍ॅलोपॅथिक औषधे व इंजेक्शन्स देऊन उपचार करणाऱ्या एका भोंदू डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले, तर भुसावळ शहरात ‘जनसेवा क्लिनिक’वर धाड टाकून बनावट डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अडावद पोलिसांना वटार येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (१० ऑगस्ट) दुपारी पोलिस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी अरुपकुमार अजयकुमार आढळ (४१) हा कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय नोंदणी नसतानाही रुग्णांवर अ‍ॅलोपॅथिक औषधे आणि इंजेक्शनद्वारे उपचार करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडील प्रमाणपत्रांची तपासणी केली असता ती वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून स्टेथॉस्कोप, विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन्स आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. याप्रकरणी पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भुसावळातील जनसेवा क्लिनिकवरही कारवाई

दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनीही बोगस डॉक्टरविरोधात कारवाई केली. जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान उमेश मधुकर सपकाळे हे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात आणले.या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले

वैद्यकीय शिक्षण आणि अधिकृत नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. वटार आणि भुसावळातील कारवाईनंतर बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.