दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

0

राज्याच्या राजकारणासह शिक्षण क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी कोल्हापुरातील निवासस्थानी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात मोठा ठसा उमटवला. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. त्यांनी कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि पुढे कोल्हापूरचे महापौर, १९७२ मध्ये पन्हाळा मतदारसंघाचे आमदार, तसेच त्रिपुरा (२००९–२०१३) आणि बिहार (२०१३–२०१४) चे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. काही काळ त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.

शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिले. त्यांच्या नावाने देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विद्यापीठांचे संकुल उभे राहिले. गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले होते.

एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पाटील कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.” डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील एक मोठे पर्व संपल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.