‘भुजबळ वरिष्ठ नेते; पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील’ – गिरीश महाजन
नाशिक | नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. शहरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात बॅनरबाजीही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावच्या बायपास वरील आसोदा रेल्वे पुलाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “छगन भुजबळ हे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. लोकांच्या भावना मी समजू शकतो. मात्र पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्रीांकडे आहेत आणि तेच योग्य तो निर्णय घेतील.”


रायगडच्या पालकमंत्रिपदावरही भाष्य
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरील तिढ्याबाबत बोलताना महाजन म्हणाले की, विधान परिषदेच्या जागेच्या निर्णयावेळी यासंदर्भात चर्चा झाली होती. “रायगडचा तिढा लवकरच सुटेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“भुजबळांशी कुठलाही दुरावा नाही”
छगन भुजबळ आणि आपल्यात अबोला असल्याच्या चर्चांना फेटाळून लावत महाजन म्हणाले, “आमच्यात कुठेही अबोला किंवा मतभेद नाहीत. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमातही मी त्यांना स्वतः हात धरून मंचावर घेऊन गेलो. आमचे संबंध अतिशय चांगले आहेत.”
संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, “संजय राऊत यांना काहीही बोलण्याची मुभा आहे. मला त्यांच्यासारखं बोलता येत नाही. माझ्यावर पक्षाची आणि पदाची बंधने आहेत. त्यांनी अनेकदा देशाचे पंतप्रधान, केंद्रीय नेते आणि न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे. मला त्यांच्या वक्तव्यांवर अधिक काही बोलायचे नाही.”