आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अनावर; मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून हत्या, शालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

0

जामनेर । आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने आपल्या मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. डोक्यात मोठा दगड मारून गंभीर जखमी केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव प्रशांत सुभाष चौधरी (वय २६, रा. सुभाषपुरा, फत्तेपूर) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या शालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी यांनी काही काळापूर्वी एका तरुणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे तरुणीच्या भावाच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता. सूड उगवण्याच्या उद्देशाने त्याने प्रशांतला विश्वासात घेत तोरणाळा जंगल परिसरात नेले. तेथे दोघांनी मद्यप्राशन केल्यानंतर आरोपीने संधी साधून प्रशांतच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

हल्ल्यानंतर प्रशांतचा मृत्यू झाल्याचा समज करून आरोपीने त्याला जंगलातील खड्ड्यात फेकून दिले. त्यानंतर त्याच्या अंगावर झाडांची पाने टाकून तो घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, प्रशांत घरी परतला नसल्याने त्याची आई सरला चौधरी यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली असता प्रशांत जंगलात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला प्रथम जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली.

प्रशांतच्या मृत्यूनंतर फत्तेपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत.

कौटुंबिक वाद आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणातून घडलेल्या या हत्याकांडामुळे जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.