अमळनेर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनने गुन्हेगारांमध्ये खळबळ; शस्त्रांसह अनेकांवर कारवाई

0

अमळनेर । कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अमळनेर शहर व तालुक्यात पोलिसांनी गुरुवारी पहाटे व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या विशेष मोहिमेत अवैध शस्त्रधारक, सराईत गुन्हेगार, दारूबंदी व जुगाराशी संबंधित आरोपी, वाहतूक नियमभंग करणारे तसेच वॉरंटधारकांवर एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान गावठी बंदूक आणि तलवार जप्त करण्यात आली असून विविध कायद्यांअंतर्गत अनेक गुन्हे नोंदविण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अमळनेर पोलीस ठाण्याचे ७ अधिकारी व ६२ कर्मचारी तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे १ अधिकारी व १० कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील संवेदनशील भाग, संशयितांचे अड्डे, हॉटेल्स, लॉजेस आणि सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी तपासणी करण्यात आली.

कारवाईदरम्यान शस्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गावठी बंदूक बाळगणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तलवार बाळगणाऱ्या आणखी एका व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत ९, तर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ५ गुन्हे दाखल करण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ जणांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत ३, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अंतर्गत ७ प्रकरणे नोंदविण्यात आली.

मोहिमेदरम्यान दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या ११३ संशयितांची पडताळणी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच २५ हिस्ट्रीशीटरांची तपासणी करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.

वाहतूक नियमभंगाविरोधातही पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. मोटार वाहन कायद्यांतर्गत ३६ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. एमव्ही ॲक्ट कलम ६६/१९२ अंतर्गत १ गुन्हा नोंदविण्यात आला, तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३ चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच मॉडिफाईड (मोसा) सायलेन्सर वापरणाऱ्या २ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

याशिवाय बेपत्ता असलेल्या ६ महिलांचा शोध घेण्यात आला. न्यायालयीन आदेशानुसार १५ अजामीनपात्र (NBW) आणि ६ जामीनपात्र (BW) वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली. २१ समन्स बजावण्यात आले, तर शहरातील १६ हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६ व १२९ अन्वये २० संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अशा विशेष कोम्बिंग मोहिमा नियमितपणे राबवून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या व्यापक कारवाईमुळे अमळनेर परिसरातील गुन्हेगार आणि सराईत इसमांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.