राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी
राज्यात गेले ३ दिवस पावसाने जोर धरला आहे. आज कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांतही जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. मुंबईत देखील पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत अतिजोरदार पाऊस, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथा येथे यलो अलर्ट जारी असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.


विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे २५ जुलै पासून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. या दिवशी राज्यात कोणत्याही भागासाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट नसणार आहे. मात्र, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि सातारा घाट परिसरासाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. उर्वरित भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे.
यापुढे २६ आणि २७ जुलै रोजी हवामानात आणखी सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दोन्ही दिवशी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट राहण्याचा अंदाज असून, केवळ पुणे घाट परिसरात यलो अलर्ट लागू राहू शकतो. त्यामुळे सलग काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.