महाराष्ट्र हवामान अंदाज: पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी होणार
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने २३ ते २७ जुलै २०२६ या कालावधीसाठी जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, २७ जुलैपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा प्रभाव कायम असला तरी, बहुतांश भागांमध्ये परिस्थिती सुधारत आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


२४ जुलै : रेड अलर्ट नाही
२४ जुलै (शुक्रवार) रोजी पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. याशिवाय पालघर, नाशिक घाट, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट भागात यलो अलर्ट राहील.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
२५ जुलै : आणखी कमी होणार पावसाचा जोर
२५ जुलै (शनिवार) रोजी राज्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत. केवळ रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांसाठी यलो अलर्ट कायम राहणार असून, उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
२६ आणि २७ जुलै : बहुतांश राज्यात ग्रीन अलर्ट
२६ जुलै (रविवार) आणि २७ जुलै (सोमवार) रोजी हवामानात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे. या दोन दिवसांत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पुणे घाट परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट राहण्याची शक्यता असून, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाने यलो अलर्ट असलेल्या भागांतील नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.