मध्य प्रदेशातील उमर्टीत ३ जिल्ह्यांच्या पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयितांना बेड्या

0

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासह अवैध शस्त्रास्त्रांच्या निर्मिती आणि तस्करीच्या साखळीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलीस दलाने मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमर्टी येथे मंगळवारी पहाटे मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेत एकूण १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन गावठी बंदुका, चार जिवंत काडतुसे, बंदुका तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, साचे तसेच ३२ संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली सदरची मोहीम राबविण्यात आली. जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्हा पोलीस दलाच्या ४०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. मध्यरात्री एक वाजता पोलीस पथके रवाना झाली होती. पहाटे चार ते सकाळी आठ या वेळेत पार उमर्टी परिसरात व्यापक शोध मोहीम राबविण्यात आली.

ही कारवाई चोपडा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०३/२०१६ (भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४) आणि शस्त्र अधिनियम कलम ३/२५), चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २२/२०२५ (शस्त्र अधिनियम कलम ३/२५) तसेच नाशिक ग्रामीणच्या पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १७५/२०२६ (शस्त्र अधिनियम कलम ३, ७ व २५) या गंभीर गुन्ह्यांतील फरार व संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

४५ घरांची झडती, २० जणांची चौकशी

पोलीस पथकाने पार उमर्टी येथील ४५ संशयित घरांची झडती घेतली. यावेळी २० संशयितांची सखोल चौकशी करण्यात आली, तर १२ संशयितांना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून दोन गावठी बंदुका आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी गावठी बंदुका तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, साचे आणि संबंधित साहित्य जप्त केले. तसेच महाराष्ट्र नोंदणीच्या (एमएच पासिंग) ३२ संशयित व निनावी दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांची मालकी आणि वापराबाबत स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.

२७ फरार आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग

फरार आणि संशयित २७ आरोपींच्या घरांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिओ-टॅगिंग करण्यात आले आहे. भविष्यातील शोधमोहीम, आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, विनायक कोते, केदार बारबोले, सुनील पाटील, सुधीर पाटील तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, राहुल गायकवाड, राहुल खताळ, पवन देसले, संजय सोनवणे, मधुकर साळवे आणि राजू सुर्वे यांनी सहभाग घेतला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीच्या नेटवर्कविरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील. फरार आरोपींविरुद्ध शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.