जळगाव ग.स. सोसायटी: अजबसिंग पाटलांच्या राजीनाम्यानंतर रागिणी चव्हाण यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ!

0

ळगाव । गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सरकारी नोकरांची अग्रगण्य सहकारी संस्था अर्थात ‘ग.स. सोसायटी’च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. आज झालेल्या विशेष निवडीत ग.स.च्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

अजबसिंग पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर या प्रतिष्ठेच्या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार? याबाबत सहकार वर्तुळात मोठी उत्सुकता आणि उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. आज झालेल्या निवड प्रक्रियेने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग.स. मधील सत्ताधारी सहकार व लोकसहकार गटाने एकत्र येत तगडी मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकमताने अध्यक्षपदासाठी रागिणी चव्हाण यांच्या नावावर, तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि तशी उमेदवारी जाहीर केली.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय रणनीतीचा भाग म्हणून सहलीवर गेलेले ग.स. सोसायटीचे सर्व संचालक आज थेट निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जळगावात दाखल झाले. सर्व संचालकांच्या उपस्थितीत पीठासीन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही तगडे आव्हान न आल्याने अखेर अध्यक्षपदी रागिणी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.