ट्रम्प यांच्या इराणवरील इशाऱ्यानंतर कच्चे तेल महागले; भारतात पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक तेलबाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल ७७.८६ डॉलरपर्यंत पोहोचला. याआधी तो ७६.११ डॉलर होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आगामी काळात देशांतर्गत इंधन दरांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. सध्या विविध राज्यांमधील व्हॅट आणि स्थानिक करांमुळे इंधनाच्या किमतींमध्ये फरक दिसून येत आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज जळगावात पेट्रोल ११२.५४ रुपये आणि डिझेल ९९.१७ रुपये प्रति लिटर आहे. तसेच देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर झाले आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपयांना विकले जात आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल ११३.४७ रुपयांना आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १०७.८७ रुपये आणि डिझेलसाठी ९९.६६ रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहे.
बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर १११.६८ रुपये आणि डिझेलचा दर ₹९९.५६ प्रति लिटर आहे. भुवनेश्वरमध्ये पेट्रोलचा दर १०८.९७ रुपये आणि डिझेलचा दर १००.६८ रुपये आहे. चंदीगडमध्ये पेट्रोलचा दर १०१.५४ रुपये आणि डिझेलचा दर ८९.४७ रुपये आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर ११५.६९ रुपये आणि डिझेलचा दर १०३.८२ रुपये इतका आहे. जयपूरमध्ये पेट्रोलचा दर ११३.१९ रुपये आणि डिझेलचा दर ९८.२५ रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कायम राहिल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहनचालक आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.