एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
जळगाव | जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत जळगाव जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीसाठी कुसुंबा, चिंचोली आणि पिंपळे परिसरातील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. एमआयडीसी क्षेत्रात फायर स्टेशन उभारणीसाठी आवश्यक अंदाजपत्रकीय आराखड्याच्या मंजुरीसंदर्भात पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली. तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी एमआयडीसीकडून जागा हस्तांतरण व बांधकामाच्या कामांबाबतही विचारविनिमय करण्यात आला.


ऊर्जा व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एमआयडीसीकडून महावितरणला दोन ठिकाणी सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ट्रक टर्मिनलच्या प्रलंबित बांधकामाचा विषयाबाबतही चर्चा करण्यात आली. अमळनेर येथील उद्योगांच्या रस्ता व पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जळगाव शहरातील काशीनाथ चौफुली ते एम-सेक्टर या मार्गाच्या विकासासह बाह्यवळण रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महानगरपालिका हद्दीत महावितरणसाठी दोन जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही सकारात्मक विचार करण्यात आला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित केले जाणार असून त्यात एमआयडीसीतील उद्योग व औद्योगिक संघटनांचा सहभाग राहणार आहे.
जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी वीज, रस्ता, पाणी आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी यावेळी सांगितले. प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. स्थानिक रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही श्री. घुगे यांनी केले.