लाच भोवली! भुसावळात पीएसआयसह खाजगी इसमावर गुन्हा
जळगाव । जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका खासगी इसमाचाही समावेश असून, दोन्ही संशयितांना फरार घोषित करण्यात आले आहे.
राजू सांगळे (पोलीस उपनिरीक्षक, बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ) आणि सलीम हकीम कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, तडजोडीनंतर 20 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.


याप्रकरणी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याच्या मित्राचा 28 मार्च रोजी भुसावळ शहरातील खडका चौफुली परिसरात एका व्यक्तीसोबत उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर किरकोळ हाणामारीत झाले होते. त्यानंतर समोरील व्यक्तीने तक्रारदार आणि त्याच्या मित्राविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात संशयितांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच दोन्ही संशयित फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील लाचखोरीच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.