जळगाव जिल्ह्यात भीषण उष्णतेने घेतला २० वर्षीय नवविवाहितेसह दोघांचा बळी
जळगाव । गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात तापमानाने ४५ अंशाचा टप्पा ओलांडला असून अंगाची लाही लाही होत आहे. अशातच या भीषण उष्णतेने जिल्ह्यात दोघांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये एका २० वर्षीय नवविवाहितेचा आणि ६९ वर्षीय पुजाऱ्याचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे राहणाऱ्या वैशाली सुनील मोरे या २० वर्षीय तरुणीला अचानक उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यानंतर तिला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वैशालीचा विवाह अवघ्या २० दिवसांपूर्वीच झाला होता. नव्या संसाराला सुरुवात होण्याआधीच तिच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


दरम्यान, अमळनेर तालुक्यातील बहादरपूर येथील श्रीहरी प्रभाकर दीक्षित हे अमळनेर बसस्थानक परिसरात असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. स्थानिकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, उष्णतेमुळे त्यांना उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या दोन्ही मृत्यूमुळे उष्णतेच्या वाढत्या धोक्याची गंभीरता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.