कोकण रेल्वेने चाकरमान्यांना दिलासा द्यावा ! कणकवलीसह अनेक रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर छप्पर केंव्हा लावणार
सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाड यांचा संतप्त सवाल
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मूळचे कोकणातील बोरीवली (पूर्व), मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुंबई वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेश आत्माराम लाड यांनी कणकवली रेल्वे स्थानकावरील समस्यांना वाचा फोडली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी बांधवांचे हाल कधी संपणार ? तसेच कोकणातील अनेक ठिकाणी ये जा करणाऱ्यांना त्या त्या स्थानकांवरील फलाटांवर छप्पर केंव्हा बसविण्यात येणार ? कणकवली तसेच कोकणातील अनेक ठिकाणी ये जा करणाऱ्यांना दिलासा कधी मिळणार ? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे.


कोकणात ये जा करणारे चाकरमानी आपापल्या खांद्यावर मोठमोठाली ओझी घेऊन ऊन पावसात प्रवास करीत असतात. अशा वेळी या कणकवली स्थानकावर छप्पर नसल्याने प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागतात. सुरेश आत्माराम लाड यांनी यासंदर्भात लेखी तक्रारी सुद्धा केल्या आहेत परंतु रेल्वेच्या ढिम्मच प्रशासनाने या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ते नियमित पणे कणकवली मार्गे आचरा येथे प्रवास करीत असतात आणि त्यांना अतोनात हाल सहन करावा लागतो. म्हणून त्यांनी तमाम चाकरमानी बांधवांची समस्या वेशीवर टांगून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कणकवली स्थानकावर छप्पर नसल्याने आबालवृद्ध प्रवाशांना, महिलांना त्रास सहन करावा लागतो.
ओझी उचलून जिने चढ उतर करतांना कमालीची कसरत करावी लागते. येत्या श्री गणेशोत्सवाच्या आधी फलाट क्रमांक दोन च्या पूर्वेकडे पायऱ्या आणि रस्ता बांधून द्यावा, प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात जेणेकरुन रिक्षा बोलावून प्रवासी सुखरुपपणे बाहेर पडू शकतो, अशी भावना मुंबई वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेश आत्माराम लाड यांनी व्यक्त केली आहे.