प्रवाशांसाठी दिलासादायक ! जळगाव मार्गे धावणारी बडनेरा-नाशिक मेमू आता ‘नियमित’ धावणार
जळगाव । बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ‘विशेष गाडी’ म्हणून चालवली जाणारी बडनेरा-नाशिक रोड मेमू रेल्वे आता कायमस्वरूपी नियमित स्वरूपात धावणार आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवाशांच्या मागणीला यश
बडनेरा ते नाशिक या दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्यांसाठी ही मेमू गाडी अत्यंत सोयीची ठरत होती. मात्र, विशेष गाडी म्हणून धावत असल्यामुळे या गाडीचे वेळापत्रक किंवा मुदतवाढ याबाबत प्रवाशांमध्ये नेहमीच अनिश्चितता असायची. आता ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या आणि शाश्वत सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. !


आतापर्यंत बडनेरा ते नाशिक रोड मेमू गाडी ०१२११/०१२१२ या क्रमांकासह धावत होती. आता नियमित झाल्यानंतर ही गाडी ६११२९/६११३० या सुधारित क्रमांकाने धावेल. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ही मेमू आता १२ डब्यांसह धावणार आहे. विशेष गाड्यांचे भाडे सहसा जास्त असते. मात्र, आता ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना कमी तिकीट दरात प्रवासाची हमी मिळाली आहे.
ही गाडी बडनेराहून सुटल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवास करणाऱ्या तसेच नाशिक किंवा अमरावतीकडे जाणाऱ्या हजारो जळगावकरांना या नियमित सेवेचा मोठा फायदा होणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. आता या गाडीच्या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल.