चोपड्यात अवैध बियाण्यांचा ५ लाखांचे एचटीबीटी बियाणे जप्त

0

चोपडा: तालुक्यातील चुंचाळे शिवारात पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून साडेपाच लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, ज्याच्या शेतात हा साठा सापडला, त्या संशयितावर गेल्या वर्षीही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

चुंचाळे येथील नितीन नंदलाल चौधरी याच्या शेतात प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा बेकायदेशीर साठा असल्याची खात्रीशीर माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, सोमवारी (२० एप्रिल) पहाटे पोलीस पथकाने शेतात छापा टाकला. यावेळी तिथे संशयास्पद रित्या ठेवलेल्या ९ गोण्या आढळून आल्या.

कारवाईची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कृषी विभाग आणि बियाणे निरीक्षकांना पाचारण केले. कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ९ गोण्यांमध्ये ४५० पाकिटे आढळून आली. या साठ्याचे एकूण वजन २०२ किलो आहे.जप्त केलेल्या बियाण्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत ५ लाख ५० हजार रुपये आहे. पाकिटांवर उत्पादक, विक्रेता, पत्ता, बॅच नंबर किंवा किंमत असा कोणताही अधिकृत मजकूर नव्हता.

तालुका कृषी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी रामचंद्र मिठाराम पाटील यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. त्यावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात नितीन चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८ (४) आणि बियाणे कायदा १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.