आधी उन्हाचे चटके, मग पावसाच्या सरी; जळगावात निसर्गाचा अजब खेळ!
जळगाव: जळगाव जिल्ह्यात हवामानाचा लपंडाव सुरू झाला असून, नागरिकांना एकाच आठवड्यात तीव्र उष्णता आणि अवकाळी पाऊस अशा टोकाच्या दोन ऋतूंचा सामना करावा लागणार आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) ४३ अंशांची नोंद झाल्यानंतर आता पारा ४४ अंशांच्या पार जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
१७-१८ एप्रिल: जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’
पुढील दोन दिवस जळगावकरांसाठी अतिशय कठीण जाणार आहेत. उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


१९ एप्रिलपासून वादळी पावसाची एन्ट्री
भीषण उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना १९ एप्रिलपासून वेगळेच संकट गाठणार आहे. जिल्ह्यात ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावेल. २० ते २३ एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील. या पावसामुळे तापमानात तात्पुरती घट होऊन उष्णतेपासून थोडा सुटका मिळेल. मात्र यानंतर पुन्हा उष्णतेचा तडाखा बसणार आहे. कारण २५ एप्रिलपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होणार असून सूर्याचा पारा पुन्हा चढणार आहे.