जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाई
जळगाव । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा श्वास मोकळा करण्यासाठी आज प्रशासनाने ‘आरपार’ची लढाई लढली. महानगरपालिका, पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संयुक्तपणे राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे महामार्गावरील अनधिकृत टपऱ्या आणि भंगाराचे साम्राज्य भुईसपाट झाले. मात्र, कारवाईदरम्यान झालेला विरोध आणि प्रशासनावरील आरोपांमुळे दिवसभर वातावरण तापलेले होते.
अजिंठा चौफुलीवर कारवाईचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा


कारवाईची सुरुवात अजिंठा चौफुलीजवळील कब्रस्थान परिसरापासून करण्यात आली. यानंतर मोहीम भंगार बाजार आणि अजिंठा चौफुली सर्व्हिस रोड परिसरात वळवण्यात आली. मोहिमेची सुरुवातच तणावात झाली. एका कारवर जप्तीची कारवाई करताना मालकांनी आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा भंगार बाजाराकडे वळवला. येथे सर्व्हिस रोडवर विळखा घातलेल्या टपऱ्या आणि गॅरेजबाहेरील अस्ताव्यस्त साहित्य क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात आले.
कारवाईदरम्यान प्रशासनाला संमिश्र अनुभवांना सामोरे जावे लागले. काही मोठ्या व्यावसायिकांनी स्वतःहून साहित्य हटवून सामंजस्य दाखवले, तर छोटे व्यावसायिक आणि लोटगाडी चालकांनी संताप व्यक्त केला. “मोठ्या शोरूम्सच्या अतिक्रमणांना प्रशासन हात लावत नाही, मात्र गरिबांच्या पोटावर पाय दिला जातोय,” असा गंभीर आरोप करत नागरिकांनी प्रशासकीय दुजाभावावर बोट ठेवले. या गोंधळात बँक कर्मचारी आणि ग्राहकांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्याने संतापात भर पडली.
ही मोहीम उपायुक्त पंकज गोसावी आणि अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. “महामार्ग अतिक्रमणमुक्त होईपर्यंत ही मोहीम थांबणार नाही. कटू कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत,” असा कडक इशारा उपायुक्तांनी यावेळी दिला.