२४ तासांत तापमानात ३ अंशांची उसळी; जळगावकर पुन्हा उष्णतेच्या तडाख्यात

0

जळगाव  । जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा पुन्हा तीव्र झाला असून अवघ्या २४ तासांत तापमानात तब्बल ३ अंशांची वाढ नोंदवली गेली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिळालेला दिलासा आता संपुष्टात आला असून उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, गुरुवारी ३६.५ अंश सेल्सिअसवर असलेले तापमान शुक्रवारी ३८.८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. तापमानातील या अचानक वाढीमुळे दुपारच्या वेळेत उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिकांना बाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या वातावरण कोरडे आणि आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांची तीव्रता वाढली आहे. तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे तापमान झपाट्याने चढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यासाठी अधिक उष्णतेचे राहण्याची शक्यता असून तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.