उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास महागणार; १५ एप्रिलपासून तिकीट दरात १०% वाढ
जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० टक्क्यांची हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
एसटी महामंडळाने जाहीर केलेली ही दरवाढ साध्या आणि जलद (एक्सप्रेस) बस सेवांसाठी लागू असणार असून रात्रसेवेलाही ही वाढ लागू राहणार आहे. नव्या दरानुसार प्रौढ प्रवाशांसाठी प्रति टप्पा सुमारे १२ रुपये, तर लहान मुलांसाठी ७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, लांब अंतराच्या प्रवासासाठी सुमारे १०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो.


दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या गर्दीचा विचार करून एसटी महामंडळाला हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार असल्याने ही दरवाढ लागू करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वाढीव भाड्याचा विचार करून तिकीट बुकिंग करावे, असे आवाहनही एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.