पाय घसरला अन् आयुष्य संपलं; गोद्री धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत

0

जामनेर । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोदरी येथील प्रसिद्ध गोद्री धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी साडेएकच्या सुमारास घडली. आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आकाश हा महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी तो आपल्या पाच ते सहा मित्रांसह गोद्री धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. धबधब्याच्या परिसरात मित्रांसोबत पावसाळी निसर्गाचा आनंद घेत असताना त्याचा अचानक तोल गेला. पाय घसरल्याने तो उंच कड्यावरून खोल दरीत कोसळला आणि गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर त्याच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत मोठ्या धैर्याने आकाशला सुमारे एक किलोमीटर अंतर खांद्यावरून उचलत सुरक्षित ठिकाणी आणले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर त्याला फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलविण्याचा सल्ला दिला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात तसेच घटनास्थळी पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे आकाशच्या मित्रांवर शोककळा पसरली असून, आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गमावल्याने पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भादोला गावासह संपूर्ण परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पावसाळ्यात गोद्री धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. मात्र, घसरडे खडक, खोल दरी आणि वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे येथे अपघाताचा धोका कायम असतो. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षित अंतर राखावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.