जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ
जळगाव । जळगावच्या सुवर्णनगरीतील सराफा बाजारात आज (५ ऑगस्ट) सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी झेप घेतली. गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा कल असलेल्या बाजाराने आज अचानक यू-टर्न घेतल्याने ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष वेधले आहे. डॉलरच्या मजबुतीचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या किमतींवर झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

आज सकाळी बाजार सुरू होताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. GoodReturnsच्या माहितीनुसार, २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ₹१,४५,७५० वर पोहोचला असून, १ ग्रॅमचा दर ₹१४,५७५, तर ८ ग्रॅमचा दर ₹१,१६,६०० इतका झाला आहे. विशेष म्हणजे, १० तोळे सोन्याच्या दरात एका दिवसात तब्बल ₹१७,५०० ची वाढ नोंदविण्यात आली आहे.


चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. एका दिवसात प्रति किलो चांदीच्या दरात तब्बल ₹९,००० ची वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीचा दर ₹२४०, ८ ग्रॅम ₹१,९२०, तर १० ग्रॅम चांदीचा दर ₹२,४०० इतका नोंदविण्यात आला.
सोने तज्ज्ञ किरण पाटील यांनी सांगितले की, जीएसटीविना आजचा सराफा बाजारातील दर पाहता सोने प्रति किलो ₹१,४५,०००, तर चांदी प्रति किलो ₹२,२८,००० इतकी नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात ही तेजी दिसून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सराफा व्यावसायिकांच्या मते, आगामी काही दिवसांतही सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असून, खरेदीपूर्वी ग्राहकांनी दरांची खातरजमा करूनच व्यवहार करावा.