मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

0

मुंबई । महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात असून, भाजपपाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटानेही दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून अमरावती शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय श्रीराम लहाने, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून दिलीप हरिभाऊ घुगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नावे जाहीर करण्यात आल्याचे पक्षाच्या पत्रकातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाचे उमेदवार आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने यापूर्वीच अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मविआतील जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. दत्तात्रय लहाने आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवर चर्चा सुरू होती. अखेर ही जागा भाजपकडे गेली आणि कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, या निवडीवरून महायुतीतील काही इच्छुकांकडून स्वतंत्र उमेदवारीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर पक्षाचे माजी आमदार अनिल सोले यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पाचही मतदारसंघांमध्ये प्रमुख पक्षांचे उमेदवार जवळपास स्पष्ट होत असताना, बंडखोरी आणि आघाडीतील अंतर्गत समीकरणांमुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.