पावसाने राज्य विस्कळीत! अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजेसना सुट्टी; हवामान खात्याकडून ‘अलर्ट’ जारी.
मुंबई/जळगाव । राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोरदार मुसळधार हजेरी लावली असून अनेक भागांत पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने (IMD) आज (मंगळवारी) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘रेड’, ‘ऑरेंज’ आणि ‘येलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अनेक जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी


राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज अनेक जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी आणि नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.
नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोकण घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच ठाणे, नाशिक (मैदानी भाग), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात सकाळपासूनच पाऊस, ‘येलो अलर्ट’ जारी
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच जळगाव शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठे आनंदाचे तर कुठे चिंतेचे वातावरण आहे.