जळगाव जिल्ह्यात रब्बी सिंचनाचा मार्ग मोकळा! गिरणा पाटबंधारे विभागाने जाहीर केले नियोजन
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव विभागाच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावरील जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा, पांझण डावा कालवा, निम्न गिरणा कालवा तसेच बोरी व अंजनी मध्यम प्रकल्पांवरून रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये उपलब्ध पाणीसाठ्यानुसार मर्यादित सिंचन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून उपलब्ध पाणीसाठ्यानुसार दि. १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत उभी पिके तसेच हरभरा, ज्वारी, दादर, हायब्रीड कडबळ आदी हंगामी पिकांसाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. सिंचनासाठी इच्छुक लाभधारकांनी नमुना क्रमांक ७, ७-अ व ७-ब मधील पाणी मागणी अर्ज आवश्यक अटींची पूर्तता करून दि. २२ डिसेंबर २०२६ पर्यंत संबंधित पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावेत. अर्जासोबत ७/१२ उतारा अथवा खाते पुस्तिका दाखविणे आवश्यक आहे. पाणी मागणी अर्ज मंजूर होण्यासाठी उन्हाळी हंगाम २०२५-२६ पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकी भरलेली असावी. चारीच्या मुखाजवळील सलग क्षेत्रासच मंजुरी देण्यात येईल. चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागातील क्षेत्रास मंजुरी दिली जाणार नाही. शेतचाऱ्या स्वच्छ व गवतविरहित ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजू नये.


अर्जाचा निर्णय संबंधित पाटशाखा किंवा ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल. मंजूर क्षेत्रावर मंजूर पिकासच पाणी घेता येईल. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत २२ डिसेंबर २०२६ नंतर वाढविण्यात येणार नाही. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण अथवा अपरिहार्य कारणास्तव मंजूर पिकास पाणीपुरवठा करता न आल्यास होणाऱ्या पीक नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. शासनाच्या प्रचलित निर्णयांनुसार व वेळोवेळी सुधारित दरांप्रमाणे पाणी आकारणी भरणे बंधनकारक राहील. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून जास्तीत जास्त लाभधारकांनी पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. प्र. पाटील यांनी केले आहे.