जळगाव जिल्ह्यात गोळीबाराचे सत्र सुरूच! कजगावात २२ वर्षीय तरुणावर तीन राउंड फायरिंग

0

भडगाव । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराच्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पावर कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून तीन राउंड फायरिंग करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरवस्तीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २२, रा. कजगाव, ता. भडगाव) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जयेश हा कजगाव परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पावर काम करतो. संध्याकाळच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी निघाला असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन राउंड फायरिंग केली. यातील गोळी लागल्याने जयेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळावर गोळीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. गंभीर जखमी जयेशला तातडीने उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी केला? हल्ल्यामागे वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य की अन्य काही कारण आहे? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. जळगाव शहरातही गेल्या आठवडाभरात गोळीबाराच्या तीन ते चार घटना घडल्याची चर्चा आहे. त्यातच आता कजगावसारख्या ग्रामीण भागातही गोळीबाराची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण व्हावा आणि अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.