जळगाव जिल्ह्यात २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा ; १,२५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध

0

जळगाव | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाइन (आभासी) पद्धतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री यांच्या उपस्थितीत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथून करण्यात येणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयामार्फत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील २३ ठिकाणी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे आयोजन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, अतिरिक्त एम.आय.डी.सी., भुसावळ रोड, जळगाव; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव; लिग्रॅड इंडिया प्रा. लि., एम.आय.डी.सी., अंजिठा रोड, जळगाव; सुप्रिम इंडस्ट्रिज, एम.आय.डी.सी., जळगाव; निमजाई फाऊंडेशन स्किल सेंटर, जुना नशिराबाद रोड, जळगाव; केमीस्ट भवन, गणेशनगर, नवीन जोशी कॉलनी, जळगाव; खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) महाविद्यालय, जळगाव; एस.एस.बी.टी. महाविद्यालय, बांभोरी, ता. धरणगाव; नगर परिषद हॉल, सावदा; युआयसीटी सेमिनार हॉल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव; प्रताप महाविद्यालय, अमळनेर; सौ. रंजनीताई नानासाहेब देशमुख आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, भडगाव; राही फाऊंडेशन, नहाटा महाविद्यालय परिसर, जामनेर चौफुली, भुसावळ; आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, साखला कॉलनी, बोदवड; शिवनेरी फाऊंडेशन, चाळीसगाव; डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन, तहसील कार्यालय सभागृह, चोपडा; दादासाहेब दिगंबर शंकर पाटील आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, एरंडोल; कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर; एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा; राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा; श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, रावेर; जेडीएमव्हीपी आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, यावल तसेच जामनेर रेवा गुर्जर मंडळ संचलित श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय, जामनेर येथे करण्यात आले आहे.

नोकरी इच्छुक युवकांसाठी या मेळाव्यात १० वी, १२ वी, सर्व शाखेतील पदवीधारक, आय.टी.आय. सर्व ट्रेड, बी.ई., बी.सी.ए., एम.बी.ए., BAMS, BHMS, नर्सिंग तसेच सर्व डिग्री पात्रता धारकांसाठी १,२५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने सुप्रिम इंड. लि., गाडेगाव/जळगाव, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, हिताची ॲस्टीमो ब्रेक सिस्टम्स इं. प्रा. लि., बांभोरी, जळगाव, एस.के. ऑईल, जळगाव, सिद्धार्थ केमिकल्स प्रोडक्ट्स लिमिटेड, जळगाव तसेच वनिता हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, खडके हॉस्पिटल, वानखेडे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, आर.एल. हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल, गणपती हॉस्पिटल आदी रुग्णालये तसेच फोकस हुंडाई, मानराज मोटर्स, मानराज मोटर्स True Value, चौधरी टोयोटा आदी शोरूममधील रिक्तपदांचा समावेश आहे. ही रिक्तपदे ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने कळविण्यात आली आहेत.

ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनीही सर्व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व बायोडाटासह मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या Jalgaonskill या फेसबुक पेजला भेट द्यावी. तसेच अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव श्री. संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.