जळगावात दुचाकी चोराचा पर्दाफाश! एकाच आरोपीकडून ९ मोटारसायकली जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले असताना पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ९ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची बाजारातील किंमत २ लाख ३२ हजार रुपये आहे. या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण ९ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू


३० ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव शहरातील काबरीम पेठ परिसरात चोरीची घटना घडली होती. गोपाल स्टेशनसमोर सार्वजनिक ठिकाणी उभी केलेली बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लेटिना मोटारसायकल (एमएच १९ ईएम २३३०) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. दुपारी २ ते सायंकाळी ४.२० या वेळेत ही घटना घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान गोलू साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
एकाच आरोपीकडून ९ चोरीच्या दुचाकी हस्तगत
पोलिसी चौकशीत संशयिताने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या आणखी मोटारसायकलींची माहिती मिळाली. पोलिसांनी एकूण ९ दुचाकी हस्तगत केल्या असून, त्यांची किंमत २ लाख ३२ हजार रुपये आहे. या तपासातून जळगाव शहर पोलीस ठाण्यातील ६, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील २ आणि अन्य एका गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांमागील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने ही कामगिरी केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, पोकॉ. प्रदीप सपकाळे, छगन तायडे, राहुल रगडे आणि रिजवान शेख (स्थानिक गुन्हे शाखा) यांचा समावेश होता.
तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. वीरेंद्र शिंदे, सतीश पाटील, पोकॉ. अमोल ठाकूर, प्रणय पवार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोकॉ. कुंदनसिंग बयास, मुबारक देशमुख, विकास पवार, हर्षल महाजन यांच्यासह गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनीही या कारवाईत सहभाग घेतला. संयुक्त पथकाच्या या कामगिरीमुळे दुचाकी चोरीच्या नऊ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.