जळगावात सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

0

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी अखेर सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. जळगावच्या प्रसिद्ध सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांत झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे सोने खरेदीची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली आहे. आज, 8 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आले आहेत.

सराफ बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत झालेली ही घसरण अत्यंत मोठी आहे. गेल्या दोन दिवसांचा विचार केला, तर सोन्याच्या दरात एकूण ५,५०० रुपयांची घसघशीत कपात झाली आहे. सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून, दोन दिवसांत चांदीचे दर तब्बल १५,००० रुपयांनी खाली आले आहेत.

लग्नसराई आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरातील या अनपेक्षित घसरणीमुळे जळगावच्या सुवर्णनगरीत पुन्हा एकदा ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.