फैजपूर हादरले! पिण्याच्या पाण्याच्या बहाण्याने घरात घुसून ७५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार
यावल | यावल तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिसांनी ४५ वर्षीय संशयिताविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरी एकट्या होत्या. त्यावेळी संशयिताने पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या घराजवळ येत घरात प्रवेश केला. त्यानंतर महिलेच्या असहायतेचा फायदा घेत घरातील मागील बाजूस नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


घटनेनंतर महिला मानसिक धक्क्यात असल्याने त्यांनी तत्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसह फैजपूर पोलीस ठाणे गाठून त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत संशयित आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.