मोबाईल टॅपिंगनंतर आता फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंनी व्यक्त केला संशय

0

जळगाव । मुक्ताईनगरचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या ‘खडसे फार्महाऊस’वर अज्ञात व्यक्तीने ड्रोनद्वारे रेकी करून चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. २८ सप्टेंबरच्या रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जवळील मलकापूर रोडवरील फार्महाऊस परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. यावेळी खडसे मुंबईत होते. फार्महाऊसवरील सुरक्षा रक्षकाने ड्रोन उडत असल्याचे पाहून त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले.

या प्रकारानंतर आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांना पत्र दिले आहे. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणामागील व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या फार्महाऊसच्या परिसरात अज्ञात ड्रोन उडवून रेकी व चित्रीकरण करण्यात आले. फार्महाऊसच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून, ड्रोन कोणी उडवले, त्यामागील उद्देश काय होता आणि चित्रीकरण नेमके कशासाठी करण्यात आले, याचा तपास होणे आवश्यक आहे.

मोबाईल टॅपिंगची तक्रारही दाखल

यापूर्वीही खडसे यांनी परवानगीशिवाय तब्बल ६२ दिवस मोबाईल टॅपिंग करण्यात आल्याची तक्रार दाखल केली होती. आता फार्महाऊसवर ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांनी या दोन्ही घटनांचा संदर्भ देत आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

दरम्यान, फार्महाऊसवर ड्रोन नेमका कोणी उडवला, त्याचे चित्रीकरण कोणत्या उद्देशाने करण्यात आले आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. ड्रोन उडवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाईचा अहवाल सादर करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.