मुक्ताईच्या चरणी महाराष्ट्रासाठी साकडे; चंद्रकांत पाटलांकडून नाथाभाऊंच्या कार्याचा गौरव

0

जळगाव । संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण व्हावे, राज्यातील प्रत्येक घटकाला सुख, आनंद आणि सुरक्षितता मिळावी, तसेच सरकारकडून सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी बळ मिळावे, यासाठी मुक्ताईच्या चरणी प्रार्थना केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कोथळी येथे एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

नाथाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी कोथळीत

एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा देण्यासाठीच आपण कोथळी येथे आलो असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने आज खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेत एकनाथराव खडसे यांचा सत्कार केला, असे त्यांनी नमूद केले.

‘भाजप उभा करण्यात नाथाभाऊंचा मोठा हातभार’

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाला उजाळा दिला. “१९८० मध्ये विद्यार्थी परिषदेसाठी मी घर सोडले, त्यावेळी एकनाथराव खडसे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर ते आमदार झाले आणि पुढे राज्यातील विविध मंत्रिपदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली,” असे पाटील म्हणाले.

“भारतीय जनता पक्षाला उभे करण्यात नाथाभाऊंचा मोठा हातभार आहे. महाराष्ट्रात भाजप मजबूत करण्यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले,” असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६० पासून राज्य घडवण्यात अनेक नेत्यांचे योगदान राहिले आहे. अशा योगदान देणाऱ्या नेत्यांच्या यादीत नाथाभाऊंचेही नाव असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

दीर्घायुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

एकनाथराव खडसे यांनी ७४ वर्षे पूर्ण करून ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे. सध्या त्यांची प्रकृती फारशी चांगली राहत नसल्याचे सांगत, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि दीर्घायुष्य मिळावे, यासाठी शुभेच्छा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कोथळी येथे मुक्ताई मंदिराच्या दर्शनासह खडसे यांच्या सत्कारामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही वातावरणाची रंगत आली.

Leave A Reply

Your email address will not be published.