स्वाती महेंद्र मोहिते यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार ; शनिवारी बोरीवली येथे होणार समारंभपूर्वक प्रदान

0

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार पेण येथील आई डे केअर संस्थेच्या श्रीमती स्वाती महेंद्र मोहिते यांना जाहीर झाला आहे. केशवसृष्टी पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बोरीवली पश्चिम येथील अटल स्मृती उद्यान सभागृहात होणार आहे.

सुप्रसिद्ध लेखक, तंत्रज्ञ, उद्योगरत्न आणि समाज सेवक श्री.अच्युत गोडबोले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर आमदार अतुल भातखळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान केशव सृष्टीचे अध्यक्ष श्री. सतीश मोढ हे भूषविणार आहेत. श्रीमती स्वाती मोहिते यांचा हा प्रवास त्यांच्या मुलीच्या, चैतालीच्या जन्मापासून सुरु झाला. मुलगी पाच महिन्याची असताना त्यांना कळले की ही मुलगी सामान्य नाही. तिला बौद्धिक दिव्यांगत्व आणि सेरेब्रल पाल्सी झालेले आहे. डॉक्टरांनी हे सांगितल्यावर स्वाती मोहिते यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळेपासून एका विशेष मुलीचे पालक म्हणून स्वाती आणि महेंद्र मोहिते यांची वाटचाल सुरु झाली.

तिला थेरपीसाठी घेऊन जाणे, विशेष मुलांची शाळा शोधणे ही कामे सुरु झाली. परंतु पेण सारख्या छोट्या गावात विशेष मुलांची शाळा नव्हती. म्हणून स्वाती मोहिते यांनी स्वत: विशेष शिक्षण देण्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि चैतालीला घरीच शिकवण्यास प्रारंभ केला. गावातली आणखी ५-६ मुले त्यांच्याकडे शिकायला येऊ लागली. दरम्यान त्यांनी त्यांचे शिक्षणही पूर्ण केले. २०११ पर्यंत १५-२० विद्यार्थी येऊ लागले. विद्यार्थ्याची संख्या वाढत गेल्यामुळे, घराची जागा अपुरी पडायला लागली. नंतर त्यांनी ७ वेळा शाळेची जागा बदलली. श्री वामन मिरवणकर यांनी संस्थेची स्वत:ची जागा होईपर्यंत स्वत:चा बंगला विनामूल्य वापरण्यासाठी दिला. त्यानंतर २०११ मध्ये आई डे केअर संस्थेची स्थापना झाली.

आज संस्था आजूबाजूच्या खेड्यातून आलेल्या, अत्यंत गरीब कुटुंबातील ७० विशेष मुलांना कोणतीही फी न आकारता प्रशिक्षण देत आहे. यामध्ये त्यांचे शिक्षण, फ़िजिओ थेरपी, स्पीच थेरपी, अक्यू प्रेशर थेरपी, हे उपचार आणि त्यांना व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण, विनामूल्य बस सेवा, युनिफॉर्म, जेवणाची सोय पुरवते. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय ही करून देते.

केशव सृष्टीतर्फे दरवर्षी सामाजिक काम करणार्‍या व्यक्तिस, संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार निवड समितीतर्फे अनेक सामाजिक संस्थांची माहिती घेण्यात येते. तसेच तिथे प्रत्यक्ष भेट देऊन या पुरस्काराची निवड करण्यात येते. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा श्रीमती अमेया जाधव असून समितीमध्ये डॉ अलका मांडके, डॉ शुभा राऊळ, डॉ कविता रेगे, हेमा भाटवडेकर, शुभदा दांडेकर, वैजयंती कुलकर्णी- आपटे, रश्मी भातखळकर, राधा पेठे, अर्चना वाडे, सुनयना नटे, सुनिता तिवारी आणि सीमा उपाध्याय यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.